रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने आज सोरेन यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने १३ जून रोजी सोरेन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
सोरेन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अरुण चौधरी यांनी सांगितले की, न्यायालयाने प्रथमदर्शनी सोरेन यांना या प्रकरणात दोषी नसल्याचे नमूद केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे कार्याध्यक्ष सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात अटक केली होती.
४८ वर्षीय सोरेन सध्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाचे वकील एस. व्ही. राजू यांनी युक्तिवाद केला की जर सोरेनची जामिनावर सुटका झाली तर ते पुन्हा असाच गुन्हा करतील. मात्र, न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद फेटाळला आणि सोरेन यांना जामीन मंजूर केला.