37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रसाहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो

साहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो

बीड : बारामती येथील सभेत जेष्ठ नेते शरद पवार यांचा आवाज बसला होता आणि त्यानंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांच्या तब्येतीबद्दल बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ‘साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा, अशी भावनिक साद सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून केली आहे.

प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारी (ता. ६) असणारे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार प्रथमच सोमवारी जिल्ह्यातील आष्टी येथे बजरंग सोनवणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची ही पहिलीच मोठी सभा होती. सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज देखील साधेपणाने एकट्याने जाऊन भरला. आतापर्यंत सोनवणे जिल्ह्यात तालुकानिहाय संवाद दौरे काढून बैठका घेत आहेत. गावोगावी त्यांचे बैलगाडीतून मिरवणुका, तुतारीच्या निनादात जंगी स्वागत केले जात आहे.

दरम्यान, सोनवणे यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांची पहिलीच मोठी सभा सोमवारी होणार होती. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी पवारांना तब्येतीला जपण्याची भावनिक साद घालत विजय खेचून आणण्याचा शब्द दिला आहे.

सोनवणे म्हणाले, माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजले आणि साता-याच्या सभेची आठवण झाली. त्यावेळी तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण पाऊसही तुम्हाला थांबवू शकला नाही.. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. तुम्ही पाच – सहा दशकात अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा!’

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिले आहे. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या!, असेही सोनवणे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR