22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरकांद्याच्या वांद्यामुळे बळीराजा मेटाकुटीला

कांद्याच्या वांद्यामुळे बळीराजा मेटाकुटीला

सोलापूर : हवामान बदलाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील कांदा पिकाला सर्वाधिक बसत आहे. मागच्या काही वर्षापासून दरवर्षी अवकाळीचे वेगळे संकट कांदा पिकावर येत आहे. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आधाराची आवश्यकता आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यामध्ये फारसा बदल झाला नसून सरासरी तापमानात मात्र वाढ झाली आहे. सातत्याने अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम जिल्ह्यातील कांदा पिकावर होत असल्याची माहिती वातावरण बदल या विषयाच्या अभ्यासकांनी दिली.

कांदा हे सोलापूर मधील शेतकऱ्यांचे मुख्य पीक नव्हते. परंतु,मागील काही वर्षात कांदा लागवडीत खूप मोठी वाढ कधी तरी झाली आहे. लॉटरी लागल्याप्रमाणे कांद्याला भाव मिळाला तर रातोरात शेतकरी श्रीमंत होतो, तर कधी कांदा दर पडले तर उत्पादन खर्चदेखील निघत नाही. मात्र, नशिबावर हवाला ठेऊन दरवर्षी कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर, मोहोळ,दक्षिण सोलापूर, माढा यासह अनेक तालुक्यात कांद्याचे उत्पादन हमखास घेतले जात आहे.

तथापि, जिल्ह्यातील ११तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सव्हें केल्यानंतर असे दिसून आले की, गेल्या १० ते १५ वर्षात कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. यापैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. कमी कालावधीत आणि कमी खर्चात निघणारे पीक म्हणून कांद्याची लागवड केली जात आहे. कांदा लावून त्वरित फायदा मिळवणे हा कांदा लागवडीमागील हेतू असावा. हवामान बदलाविषयी योग्य माहिती न मिळणे, पेरणीच्या वेळी हवामान अंदाज गृहीत न घरणे, किडीचे वाढते प्रमाण व त्यासाठी फवारण्यात येणाऱ्या औषधांवरील वाढता खर्च यामुळे कांदा उत्पादन घेणे अधिक खर्चिक बनले आहे.

माती परीक्षण न करता अंदाजे दिली जाणारी रासायनिक खते,काही ठराविक कांदा प्रजातीची लागवड,किडीमुळे उत्पादित कांद्याची गुणवत्ता कमी होणे,सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खतांचा वापर,पुरेशा पावसाअभावी विंधन विहिरीच्यापाण्याचा वापर ही कांद्याचा दर्जा घसरण्याची कारणे आहेत.निकृष्ट दर्जाच्या कांद्याला भाव न मिळणे, कांदा साठवणूक सोय नसणे, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचे नुकसान या समस्यांना जिल्ह्यातील शेतकरी तोंड द्यावे लागत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांमध्ये हवामान बदलाविषयाची माहिती वेळेत पोचणे आवश्यक आहे.

कांदा पिकातील दरातील घसरण ही शेतकऱ्यांच्या नेहमीच मुळावर येते. यासाठी कांदा लागवड व साठवणुकीच्या विविध पद्धतीविषयीची शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी साठवणीची व्यवस्था असणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारात कांदा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा पुरविणे गरजेचे आहे. कांदा दर स्थिर राहतील असेच आयात निर्यातीचे धोरण ठेवले तरच कांदा पीक लागवडीत तोटा होणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR