ढाका : ज्या भूमिक पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने १९७१ मध्ये हुसकावून लावले होते. त्याच भूमिक आता पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी सैन्याला प्रशिक्षण देणार आहे. बांगलादेशच्या विद्यमान अंतरिम सरकारने पाकिस्तानशी लष्करी आणि सामरिक संबंध वाढवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, यामुळे भारतासमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकतात.
बांगलादेश लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष पथक फेब्रुवारी २०२५ मध्ये तेथे पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यात हे प्रशिक्षण मेमेनशाही छावणी येथील आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रीन कमांड मुख्यालयात होणार आहे. हा कार्यक्रम एक वर्ष चालणार आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कर बांगलादेशच्या सर्व १० लष्करी कमांडमध्ये प्रशिक्षण देईल. जनरल मिर्झा यांनी नोव्हेंबरमध्ये हा प्रस्ताव बांगलादेशला पाठवला होता. जो बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी स्वीकारला.
हा निर्मय म्हणजे शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर झालेला मोठा बदल आहे. कारण अंतरिम सरकारने पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. पाकिस्तानी नौदलासोबत बांगलादेशचा अमन-२०२५ हा सराव फेब्रुवारी २०२५ मध्ये कराची बंदरावर होणार आहे.
हा सराव दर दोन वर्षांनी होतो, मात्र बांगलादेश गेली १५ वर्षे यापासून दूर होता. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत पाकबरोबर कोणत्याही लष्करी सरावावर बंदी होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केवळ या सरावात सहभागी होण्याचे मान्य केले नाही, तर बंगालच्या उपसागरात पाक नौदलासोबत संयुक्त सरावाची तयारीही केली आहे.
शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात बांगलादेशने पाकिस्तानशी संबंध मर्यादित केले होते. २०२२ मध्ये शेख हसीना यांनी पाकिस्तानी युद्धनौका पीएनएस तैमूरला चटगाव बंदरावर लगर लावण्याची परवानगी दिली नाही. पण सध्याच्या अंतरिम सरकारने केवळ पाकिस्तानमधून चटगावला येणा-या मालवाहूकांना परवानगी दिली नाही, तर या मालाला तपासणीतूनही सूट दिली आहे.
भारतासमोर मोठे आव्हान
ढाका आणि इस्लामाबाद दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पाक नागरिकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पाकिस्तानी मालवाहू जहाजाला चितगाव बंदरात तपासणी न करताच प्रवेश देण्यात आला. बांगलादेशातील सध्याच्या बदलांमागे पाकिस्तानची रणनीती दिसते.
पाक समर्थक सक्रिय
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आणि अंतरिम सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान समर्थक शक्ती बांगलादेशात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत, ज्या आता उघडपणे समोर येत आहेत. पाकिस्तानचे हे पाऊल सामरिक दृष्टिकोनातून भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते.