31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयभाजपचा भाषा बदल!

भाजपचा भाषा बदल!

लोकसभा निवडणुकीचे बिगूल अत्यंत आत्मविश्वासाने फुंकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला होता. निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीपूर्वीच विरोधकांना पुरते गार करून टाकण्याचा हा ‘माईंड गेम’ होता. त्यात भाजप सुरुवातीच्या टप्प्यात यशस्वी झाल्याचेही चित्र देशात दिसत होते. मात्र, आता निवडणुकीच्या तिस-या टप्प्याचे मतदान पार पडलेले असताना भाजपची व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा व प्रचाराची दिशा पुरती बदललेली पहायला मिळते आहे. आता स्वत: मोदीही ‘चारसौ पार’चा उल्लेख करताना दिसत नाहीत. तर त्यांनी आता काँग्रेस निवडून आल्यास अमूक होईल, तमूक होईल, अशी भीती मतदारांना घालण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपची भाषाच बदलून गेली. हा चमत्कार कसा घडला? तर तो काँग्रेसने भाजपचा माईंडगेम अत्यंत आक्रमकपणे त्यांच्यावरच उलटवल्यामुळे घडला! ‘चारसौ पार’च्या भाजपच्या माईंडगेमला त्यांच्याच पक्षातील वाचाळवीरांनी आपल्या बेताल वक्तव्याने सुरुंग लावला! कर्नाटकचे खासदार अनंत हेगडे, अयोध्येचे खासदार लल्लू सिंह, राजस्थानच्या ज्योती मिर्धा यांनी भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधान बदलण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केले आणि काँग्रेसला भाजपला त्यांच्याच माईंडगेममध्ये अडकविण्याची आयती संधी मिळाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संधीचा अत्यंत आक्रमकपणे वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा हव्या असल्याची तोफ डागली व भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, हा संदेश दलित, आदिवासी, मागासवर्गीय व तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेसने अत्यंत आक्रमकपणे पोहोचवला.

भाजप आपल्याच वाचाळवीरांमुळे आपल्याच जाळ्यात अडकला व मागच्या दहा वर्षांत प्रथमच बॅकफूटवर गेला. स्वत: मोदी, शहा, नड्डा, संघप्रमुख मोहन भागवत यांना संविधान बदलले जाणार नसल्याचे खुलासे करणे भाग पडले. यामुळे भाजप या निवडणुकीच्या प्रचाराचे जे नॅरेटिव्ह सेट करू इच्छित होता ते समीकरण पुरते बिघडून गेले. मतदानाच्या दुस-या टप्प्यानंतर आता त्याची प्रचिती येते आहे. भाजपच्या सेनापतीच्या प्रचारात आता विकसित भारताचा संकल्प हा तोंडी लावण्यापुरताच येतो आहे. मोदींना दहा वर्षांच्या आपल्या सत्ताकाळानंतरही आपली सत्ता टिकविण्यासाठी काँगे्रसचे भूत लोकांसमोर उभे करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काँग्रेसचे हे मोठे यशच मानायला हवे कारण मोदीपर्वात होणा-या निवडणुकीत प्रथमच काँगे्रसने भाजपला आपल्या मैदानावर खेळायला भाग पाडले आहे. यातूनच भाजपची प्रचाराची दिशा पुन्हा ध्रुवीकरणाच्या हुकमी मुद्यावर आली आहे. यातूनच काँग्रेसची सत्ता आली तर हिंदू समाजाची संपत्ती हिसकावून घेतली जाईल, त्याचे फेरवाटप करून ती मुस्लिम समाजात वाटली जाईल, ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना वाटेकरी करण्यात येईल, असा प्रचार आता स्वत: मोदी यांनीच सुरू केला आहे.

थोडक्यात या चमत्काराचे श्रेय काँग्रेसला द्यावे लागेल. काँग्रेसने भाजपचा माईंडगेम त्यांच्यावरच उलटवून सर्वच भाजपविरोधी राजकीय पक्षांना संजीवनी बुटी मिळवून देणारा ठोस मुद्दा उपलब्ध करून दिला आहे. त्यातूनच भाजपची भाषा पुरती बदलली आहे आणि ‘चारसौ पार’ची घोषणा भाजपच्या प्रचारातून पुरती हद्दपार झाली आहे. अर्थात भाजप एवढ्याने हार नक्कीच मानणार नाही. पक्ष संघटनेच्या प्रचंड ताकदीच्या जोरावर हरलेली बाजीही भाजप शेवटच्या क्षणी जिंकू शकतो. त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेलाच आहे. अनुकूल वातावरण असतानाही काँग्रेसला मध्य प्रदेशात भाजपला सत्तेतून दूर करता आले नाही. मात्र, यातून काँग्रेसने योग्य तो बोध घेतलेला दिसतो. त्यातूनच सध्या तरी काँग्रेसने भाजपला त्यांच्याच माईंडगेमच्या जाळ्यात अडकवून टाकले आहे व त्यातून सुटण्याची धडपड म्हणून मोदी व भाजपने आपल्याच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’या घोषणेला तिलांजली देऊन धु्रवीकरणाच्या हुकमी अस्त्राचा वापर सुरू केला आहे. त्यातूनच आता तिस-या टप्प्याचे मतदान पार पडले असताना प्रचाराचा स्तर प्रचंड घसरला आहे.

भाजपने संविधान बदलाची बेताल बडबड करणा-यांना तिकिट नाकारून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला असला तरी बृजभूषण यांच्या चिरंजीवांना तिकिट दिल्याने भाजपची सत्ता टिकविण्यासाठीची असहाय्यताही स्पष्ट होते आहे. तसेही भाजपला खरोखरच ‘चारसौ पार’चा पल्ला गाठण्याचा आत्मविश्वास असता तर सुरत वा इंदूरमधून काँग्रेस उमेदवारांचे अपहरण करण्याचा मार्ग निवडावा लागला नसता. भाजप भलेही हे सगळे लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्याचा दावा करत असला तरी तो खरा कोण मानणार? बहुमताचा आकडा गाठण्याची शाश्वती नसल्यानेच भाजपने हे तंत्र अवलंबिले आहे काय? असा प्रश्न या सगळ्या घटनाक्रमातून निर्माण होतो. भाजपच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी भाजपला नक्की मतदान करतील, हा भाजप नेत्यांचा दावा खरा मानला तरी या निवडणुकीत काँग्रेसने महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपची पुरती कोंडी केल्याचे चित्र तिस-या टप्प्यातील मतदानावेळीच स्पष्टपणे दिसते आहे.

एकंदर या निवडणुकीच्या प्रचारात काँगे्रसने भाजपला सध्या तरी माईंडगेममध्ये पिछाडीवर टाकल्याचे स्पष्ट आहे आणि त्यातूनच भाजपची प्रचाराची भाषा पुरती बदलून गेल्याचे दिसते आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माईंडगेममधील ही आघाडी कायम राखली तर ४ जूनला भाजपला सरकार स्थापनेसाठी जमवाजमवीची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पहायला मिळू शकते. विरोधी पक्षांसाठी ही नक्कीच पर्वणी असेल! अर्थात उर्वरित पाच टप्प्यांत भाजप आणखी कोणते माईंडगेम खेळून विरोधकांवर प्रतिहल्ला चढवतो यावरही निकालाचे चित्र अवलंबून असणार आहे, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. तूर्त निवडणुकीच्या तिस-या टप्प्यापर्यंत काँग्रेसने भाजपवर माईंडगेममध्ये आघाडी घेतल्याने भाजपची भाषा बदलली आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR