20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रसैफ अलीवरील हल्ल्याला धार्मिक रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न

सैफ अलीवरील हल्ल्याला धार्मिक रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर आणि पकडलेल्या व्यक्तीत साम्य नाही

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू-मुस्लीम असा नसून तो सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु सत्ताधारी भाजपमधील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर आणि अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नसल्याचा दावा केला जात आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी खुलासा करावा आणि सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणीही त्यांनी केली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजप सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती. आजपर्यंत सीबीआयने त्याचा अहवाल दिला नाही. भाजप सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजप धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली.

सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहीर केले आहे. परंतु सीसीटीव्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर आणि अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नसल्याचा दावा केला जात आहे. या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा आणि सत्य जनतेसमोर मांडावे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

मुंबईत सुरक्षित समजल्या जाणा-या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत. याशिवाय गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिका-यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत असून त्याचा हा परिणाम असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजप युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिनींना प्रति महिना दीड हजार रुपये दिले. पण आता या योजनेचा लाभ अपात्र बहिणींनी घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांगलादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांगलादेशी भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपला म्हणायचे आहे का? असा सवाल करत पटोले यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणा-या सरकारवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR