20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींसाठी भाजपची मोर्चेबांधणी

ओबीसींसाठी भाजपची मोर्चेबांधणी

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटलेले असतानाच ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसींमध्ये असंतोष वाढला आहे. त्यातच सत्ताधा-यांच्या विरोधात राग व्यक्त होत असतानाच भाजपने आता ओबीसींचा रोष कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी आज बैठक घेऊन ओबीसींना अधिक सवलती देण्याचे आश्वासन दिले. आगामी निवडणुकीत ओबीसींच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रान पेटविले. या आंदोलनात त्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे ओबीसींनी या मागणीला विरोध केला. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारबद्दल रोषही व्यक्त होऊ लागला. अशा स्थितीत आगामी काळात ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून भाजपने आता जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज भाजप ओबीसी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत अतुल सावे यांनी महत्त्वाची आश्वासने दिली.

यावेळी अतुल सावे यांनी सरकारकडून सुरू असलेल्या ओबीसी योजनांतील अटी व शर्थी शिथिल करणार असल्याची ग्वाही दिली. जेणेकरून ओबीसी समाजातील रोष कमी करता येईल. भाजप ओबीसी मोर्चा बैठकीत चर्चेनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकीत काही समाजांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने भाजपने काही समाजांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी आदी समाजाकडे भाजपने लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. विश्वकर्मा योजना त्याचाच एक भाग आहे.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत ३ लाख लाभार्थीचे लक्ष्य
ओबीसी समाजासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना तळागाळात राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक हजार विश्वकर्मा लाभार्थी तयार करणार आहेत. अशा पद्धतीने राज्यात ३ लाख लाभार्थी तयार करण्याची योजना भाजपने आखली आहे.

प्रत्येक लाभार्थ्याला ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
विश्वकर्मा योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्याला एक ते तीन लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेतून तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी वाटण्याचे भाजपचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील एका महिन्यात ही योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR