पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच आता हडपसर परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हडपसरमधील एका नामांकित रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात ही संशयास्पद वस्तू आढळली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. बुधवारी (१३ मे २०२६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हडपसर येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ‘उषाकिरण’ रुग्णालयात ही घटना घडली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील बाथरुममध्ये बेसिनखाली एका महिला कर्मचाऱ्याला ही वस्तू दिसली. तिने तात्काळ याची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या वस्तूमध्ये चार जिलेटिनच्या कांड्या, त्यांना गुंडाळलेला टेप, वायर आणि एक घड्याळ (टायमर) जोडलेले होते. विशेष म्हणजे, त्या टायमरवर ७ वाजून २१ मिनिटांची वेळ दिसत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेत ती वस्तू एका खोक्यात ठेवून तातडीने रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत हलवली आणि पोलिसांना पाचारण केले.
पोलिस प्रशासन आणि BDDS कडून कारवाई
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आणि रुग्णालय परिसर रिकामा केला. BDDS पथकाने ती वस्तू सुरक्षितरीत्या ताब्यात घेतली आणि रात्री ११ वाजेच्या सुमारास हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित पद्धतीने निकामी केली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वस्तू प्राथमिक तपासात लो-ग्रेड आयईडी (IED) असल्याचे दिसून आले आहे. ही वस्तू नेमकी कशासाठी आणि कोणी ठेवली होती, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून तपास सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यामध्ये एक संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येऊन रुग्णालयातील बाथरुममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह एटीएस (ATS) पथकही या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

