Homeमनोरंजनबॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी'चा डंका! १२ दिवसांत ८६ कोटींची कमाई करत रितेश देशमुख यांनी...

बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा डंका! १२ दिवसांत ८६ कोटींची कमाई करत रितेश देशमुख यांनी रचला इतिहास

मुंबई: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख हे सध्या यशाच्या शिखरावर असून त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले असून ८० कोटींचा टप्पा पार करत रितेश देशमुखच्या नावावर एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

‘राजा शिवाजी’ हा रितेश देशमुख यांच्या कारकिर्दीतील सलग चौथा यशस्वी मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी त्याचे ‘लय भारी’, ‘माउली’ आणि ‘वेड’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. विशेष म्हणजे, दिग्दर्शक म्हणून रितेश यांचा हा सलग दुसरा हिट चित्रपट आहे. २०२२ मध्ये त्याने ‘वेड’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ७५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने १२ दिवसांत जगभरातून ८६.६५ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे, तर निव्वळ (नेट) कलेक्शन ७३.१५ कोटींच्या घरात पोहोचले आहे. चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली गर्दी खेचत असून नफ्यात धावत आहे.

चित्रपटाच्या दैनंदिन कमाईचा आलेख पाहता, पहिल्या दिवशी ११.३५ कोटींनी दमदार सुरुवात झाली होती. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५२.६५ कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची पकड मजबूत राहिली असून दहाव्या दिवशी ६.८० कोटी, तर १२ व्या दिवशी २.५ कोटींची कमाई झाली आहे. रितेश देशमुख यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शनाची धुराही समर्थपणे सांभाळली आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारख्या तगड्या स्टारकास्टची फौज आहे. या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे रितेश देशमुखच्या मुलाने या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR