मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बीडचे पालकमंत्रिपद कुणाला द्यायचे हे मी, अजितदादा आणि शिंदेसाहेब ठरवू, अशी माहितीही त्यांनी दिली. बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावे, अशी मागणीही त्यांनी या आधी केली होती. सरपंच संतोष देशमुख प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा खुलासा केला. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हत्या प्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल, अशी माहिती दिली. एसआयटीमध्ये कोण असणार हे माहिती नाही, पण त्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची माहिती आपल्याला त्यांच्या सचिवांनी दिली असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार : धस
बीडचा आका हाच ३०२ चा प्रमुख सूत्रधार असून तो लवकरात लवकर आत गेला पाहिजे, असेही धस यांनी म्हटले. वाल्मिक कराडचा संबंध खंडणी प्रकरणाशी असल्याचे आधी मला वाटत होते. पण या हत्याकांडांचा प्रमुख सूत्रधार तोच असल्याचे माझे मत आहे, असे सुरेश धस म्हणाले.
वाल्मिक कराडला सरकारकडून संरक्षण
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेचे निकटवर्तीय, वाल्मिक कराडांचे नाव विरोधकांकडून वारंवार उपस्थित केले जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात आहे. खुद्द धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत. आता यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मोठा दावा केला.
अंजली दमानिया यांनी जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असलेले कागद सादर करत, त्या सात बारावर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची नावे एकत्र असल्याचा दावा केला. परळीमध्ये वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला.