बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात रविवारी भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ३७ जण जखमी झाले आहेत. बुलंदशहरातील सलेमपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बस आणि मॅक्सची धडक झाली. समोरासमोर झालेल्या धडकेत मॅक्सचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. गाझियाबादमधील कंपनीत काम करणारे कामगार रक्षाबंधनासाठी त्यांच्या घरी जात होते. तेव्हा त्यांच्या मॅक्स वाहनाला भीषण अपघात झाला. ही सगळी कामगार मंडळी अलिगढला निघाली होती. पण त्याआधीच १० जणांवर काळाने घाला घातला. बुलंदशहरमधील सलेमपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवेज बस आणि मॅक्सची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३७ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दुजोरा दिला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात दगावलेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून धरला, काहींनी ठिय्या दिला. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.