लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं नवा इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने द्विशतक झळकावले आहे. इंग्लंडच्या मैदानात लीटल मास्टर सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर द्विशतक झळकवणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.
या द्विशतकी खेळीसह शुबमन गिलनं टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा विक्रम मागे टाकला आहे. शुबमन गिल हा सेना देशांत द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. १९९० मध्ये ऑकलंडच्या मैदानात भारतीय संघाचे नेतृत्व करताना अझरुद्दीन याने १९२ धावांची खेळी केली होती. ही एसईएनए देशांत(दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. आता शुबमन गिल टीम इंडियाचा नंबर वन कर्णधार ठरला आहे.