21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलीसह सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलीसह सुनेवर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) चांगलाच झटका दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या क्लीन चिट अहवालाची माहिती लीक केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. २९ ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयने चौकशी केली होती. त्याच प्रकरणात क्लीन चिट अहवाल हा लीक झाला होता. त्यामुळे सीबीआय अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती.

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा हा आरोप होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा यांनी लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR