लातूर : प्रतिनिधी
जिल्हयातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या २ हजार ६५६ शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे.
सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. जिल्हयात जिल्हा परिषदेच्या १ हजार २७५ शाळा, मनपाच्या १६ शाळा, समाज कल्याण, नवोदय, बीएसएफ ८ शाळा, अनुदानीत ९६५, विना अनुदानीत ३९२ शाळेत अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत प्रत्येक स्तरातील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले आहे.
शाळांचे होणार गुणांकन
या अभियानात सहभागी होण-या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक आहे. अभियानात सहभागी होणा-या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे १०० गुण देण्यात येतील. या घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात सहभागी शाळांचे मुल्यांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील शाळांना रोख रक्कम व पारितोषिक दिले जाणार आहे.