नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरच्यांची लागवड केली जाते. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. अगोदर अवकाळी पावसाचा मार आणि त्यानंतर मिरची पिकावर आलेला विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतक-यांसमोर सध्या आव्हानांचा डोंगर सध्या उभा ठाकला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जात असते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे मिरची पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरचीच्या पिकावर चुरडामुरडा आणि डवणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात मिरचीच्या पिकाची पानं आखडतात. त्याचप्रमाणे मिरची ही वेडी वाकडी आकारात येत असते. तसेच झाड मरण्यााचे प्रमाण अधिक असते. मिरचीचे पोषण होत नसल्याने मिरचीचे उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली. मिरचीसाठी टाकलेला उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या शेतकरी सांगतात.
अगोदरचे दुष्काळी परिस्थिती त्यानंतर अवकाळी पाऊस आणि आता मिरचीवर आलेले विविध रोग यामुळे मिरची उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरची उत्पादक शेतक-यांना मदत करावी अशी अपेक्षा मिरची उत्पादक शेतक-यांनी केली आहे.
शेतकरी हतबल
देशातील दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. मिरची तोडण्यासाठी प्रति पाच रुपये किलो खर्च येत असून बाजारात मिळणारा भाव हा अत्यल्प आहे. सुरुवातीला ५० ते ४० रुपये किलो पर्यंतच्या दर मिळाला मात्र आता दहा रुपयापासून तर २० रुपयापर्यंत दर मिळत असल्याने मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात. कांदा टमाटा त्यानंतर मिरचीच्या दरात अचानक भाव कमी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकारने मिरचीचा हमीभाव जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे.
मागील वर्षापेक्षा दुपटीने भाव वाढ
तर दुसरीकडे भाव कमी झाल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. राजकीय भाष्य करणारे नेते शेतीमालाच्या भावावर का बोलत नाही असा संतप्त सवाल शेतक-यांकडून उपस्थित केला जात आहे. मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढले असून त्यामुळं सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्त्वाच्या घटक असलेला चटणीचे दरही वाढले आहेत.