मुंबई : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गॅस तुटवड्याच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर गॅस सिलिंडरची प्रतिकृती हाती घेऊन निदर्शने केली. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनात हस्तक्षेप करत गॅस पुरवठा सुरळीत असून बुकिंग केल्यावर २५ दिवसांत सिलिंडर मिळते असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाचा समाचार रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला आहे.
रोहिणी खडसे यांचे ट्विट चर्चेत
रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख विचित्रा ताई असा करत खोचक टीका केली. काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना विचित्रा ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. ताई म्हणतात सिलिंडर २५ दिवसांत मिळते. अहो ताई, जर एखाद्या सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस आज संपला असेल, तर तिने २५ दिवस काय करावे? २५ दिवस वाट पाहायची का? बरं, पाहतो वाट! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचे का? असा उपरोधिक सवाल खडसे यांनी केला आहे.
