श्रीक्षेत्र माहूर: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेसमोरील राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडून टाकल्याने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माहूर तालुक्यातील मौजे हडसणी आणि मदनापूर येथे मराठा आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ उपोषण सुरू करण्यात आले. असून सर्वच प्रकारच्या नेतेमंडळींना गावात प्रवेश बंद करण्यात आला असून मराठा समाजातील पदावर असलेल्या सर्व नेत्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देऊन मराठा आरक्षण समर्थनात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी एकमुखी मागणी होत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी साखळी उपोषण, पुढा-यांना गावबंदी यासह जमेल त्या मार्गाने विरोध करणे सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हे आंदोलन सुरू असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांना सर्व स्तरातून समर्थन वाढत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कुठलीही जाहिरातबाजी अथवा कार्यक्रम घेऊन नये असे आवाहन केले होते. तरीही काही हौशी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील कपिलेश्वर धर्मशाळेत समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत एक बॅनर लावले होते. ते बॅनर अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडून टाकल्याने काही वेळ परिस्थिती चिघळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बॅनर फाडल्यानंतर पोलिसांनी येथे काही वेळ बंदोबस्त ठेवला होता.