बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात २२ वर्षीय राम गोपाल मिश्रा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण परिसरात तणाव पसरला. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृत राम गोपाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अन्त्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने कुटुंबीय आणि जमावाने मृतदेह घेऊन तहसीलमध्ये निदर्शने केली.
यावेळी लोकांनी पोलिसांनाही घेराव घातला. वाहने जाळली आणि दुकाने पेटवली. संपूर्ण परिसरात सध्या वातावरण शांत असले तरी अजूनही तणावाचे वातावरण आहे. मृतांच्या गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गावाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पोलिस हटवत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीजीपीशी बोलून ताजी माहिती घेतली आहे. गृह विभागाचे सचिव संजीव गुप्ता आणि एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश घटनास्थळी पोहोचले.
अमिताभ यश यांचा एक व्हीडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते हातात पिस्तूल घेऊन काहींचा पाठलाग करताना दिसत आहेत. त्याचवेळी, पोलिसांच्या समजूतीनंतर मृत राम गोपाल मिश्रा यांचे कुटुंबीय अंतिम संस्कारासाठी तयार झाले आणि राम गोपाल मिश्रा हे बहराइचमधील घसियारीपुरा येथील मन्सूर गावचे रहिवासी होते. त्यांचे वय २२ वर्षे होते. रविवारी मन्सूर गावातील महाराजगंज बाजारपेठेतून माँ दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येत होती. संगीत वाजवण्यावरून हिंसाचार झाला आणि संघर्षादरम्यान गोळी लागल्याने राम गोपालचा मृत्यू झाला. या घटनेत जोरदार दगडफेक आणि गोळीबार झाला. यात काही लोक जखमी झाले.
एसपी वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसी तहसील अंतर्गत महाराजगंज भागातील मुस्लिमबहुल भागातून मिरवणूक जात होती. या वेळी हिंसाचार झाला आणि अराजकता माजली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत. या संपूर्ण घटनेत सलमान नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमानच्या दुकानातूनच गोळी झाडण्यात आली. ज्यामध्ये राम गोपाल यांचा मृत्यू झाला.