नवी दिल्ली : बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची सुटका झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि देशभरातील जनता आनंद व्यक्त करत आहे. काँग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना तातडीने आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात आणि त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, गेल्या १७ दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना आज (मंगळवारी) बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत दिलासा आणि आनंदाची बाब आहे.
ते म्हणाले की, १४० कोटी भारतीयांच्या प्रार्थनेमुळे आणि एनडीएमएसह सर्व यंत्रणांचे इतके दिवस सुरू असलेले ऑपरेशन अखेर यशस्वी झाले, तुम्हा सर्वांचे अनंदन. सरकारने कामगार बांधवांना तातडीने आरोग्य सुविधा आणि योग्य मोबदला द्यावा आणि बांधकाम सुरू असलेल्या सर्व योजनांचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, असे ते म्हणाले.