प्रवीण चौधरी
परभणी : मराठवाड्यात जमिनीची सुपिकता असून वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनाच्या योजना राबविल्या. त्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यात सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आम्ही आखला होता. मात्र काँग्रेसने मराठवाड्यातील या योजनेला खोडा घालत या योजना बंद केल्या असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी येथील सभेत केला.
महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ शनिवार, दि. २० एप्रिल रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय बनसोडे, मंत्री अतुल साळवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आ. मेघना बोर्डीकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. विक्रम काळे, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, संजय केनेकर, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस हा असा वेल आहे की ज्याला हा वेल लटकला जाईल त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेचे उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, परभणी जिल्हा सोयाबीनचे कोठार म्हणून ओळखला जातो. यापुढे खाद्यतेल निर्मितीसाठी परभणीचे नाव समोर येईल. तसेच अमरावती येथे होत असलेल्या टेक्स्टाईल पार्कमुळे कापूस उत्पादक शेतक-यांनाही याचा मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबविली. त्याचबरोबर मराठवाडा ग्रीड ही योजनाही असताना राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या सिंचनाच्या योजना थांबविण्याचे पाप केले असल्याचा आरोप त्यांनी केला. आता लवकरच मराठवाड्यातील सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्णत्वास जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, परभणीकरांचे स्वप्न म्हणजे माझा संकल्प राहणार असल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात रेल्वेमार्गाचे व विद्युतीकरण लवकरच पूर्ण होणार असून समृद्धी महामार्गाने परभणीला मुंबईशी जोडले जाणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने लोकोपयोगी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.