33.8 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeमहाराष्ट्रमला बदनाम करण्याचा कट

मला बदनाम करण्याचा कट

मुंबई : प्रतिनिधी
ढोंगीबाबा अशोक खरात याच्याशी नाव जोडले गेल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आम्ही भोंदूबाबाचा निषेधच करतो, पण मला बदनाम करण्याचा अजेंडा भाजपच्या कार्यालयातून राबवला जात आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडले. आसाराम बापूच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले होते. भाजपचे अनेक मोठे नेते त्यांच्यासोबत होते. मग त्यांचेही राजीनामे मागणार का? कोणासोबत फोटो असला म्हणजे तो माणूस आरोपी होत नाही. ही निव्वळ मला बदनाम करण्याची टीम भाजपची आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. भोंदूबाबा अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात खरात कडूंच्या कानात काहीतरी सांगताना आणि तुम्ही भाजपमध्ये मंत्री असताना इथे या असे म्हणताना दिसत आहे. या व्हीडीओवरून कडू यांच्यावर टीका होऊ लागताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

वयाने मोठे म्हणून पाया पडलो
बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेले होते. त्या ठिकाणी तो बाबा होता. त्याने माझा सत्कार केला. तो वयाने माझ्यापेक्षा मोठा असल्याने भारतीय संस्कृतीप्रमाणे मी त्याच्या पाया पडलो. तो बाबा कामाचा नाही हे आम्हालाही माहीत असते, पण समाजमन जपण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावे लागते. मात्र, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेधच करतो.

शहा, फडणवीस, शिंदेंना कोणी विचारते का?
भाजपवर हल्लाबोल करताना कडू म्हणाले की, याच अशोक खरातला भेटायला गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि विखे पाटील गेले होते. त्यांना कोणी जाब विचारला का? भाजप ठरवते कोणाच्या सीडी बाहेर काढायच्या आणि कोणाला बदनाम करायचे. मी गरीब आहे म्हणून मला प्रश्न विचारले जात आहेत.