नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर जीआरएपी-३ काढून टाकण्यात आले आहे. आता बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल वाहनांवरील बंदीही संपुष्टात येणार आहे. प्रदूषणाची घटती पातळी पाहता सीएक्यूएमने हा निर्णय घेतला आहे. बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल कार चालवण्यावरील बंदी संपुष्टात येणार आहे. याशिवाय बांधकाम आणि पाडकामावरील बंदीही उठवण्यात येणार आहे.
सीएक्यूएमने दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे तात्काळ प्रभावाने जीआरएपीच्या फेज ३ अंतर्गत निर्बंध उठवण्याचे आदेश दिले आहेत. सीएक्यूएमने सांगितले की, आगामी काही दिवसांत दिल्लीची हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचेल, अशी कोणतीही शक्यता नाही.
एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने सांगितले की, दिल्लीत बांधकाम आणि त्याच्याशी संबंधित प्रकल्प आणि उद्योगांचे काम पुन्हा सुरू होईल. पावसानंतर दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. दिल्लीचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेत सोमवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत ७.२ मिमी पावसाची नोंद झाली. राष्ट्रीय राजधानीतील हवे निर्देशांक (एक्यूआय) मंगळवारी सकाळी ८ वाजता ३६५ होता, जो सोमवारी दुपारी ४ वाजता ३९५ होता. दररोज संध्याकाळी ४ वाजता नोंदवलेला एक्यूआय रविवारी ३९५, शनिवारी ३८९ होता.