छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
घरगुती वादातून हिंगोली जिल्ह्यातील एका दाम्पत्याने छत्रपती संभाजीनगर येथे आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाऊराव पुंजाजी सोनाळे (४५) आणि वैशाली भाऊराव सोनाळे (४०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आपल्या दोन्ही मुलांना नांदेड येथे आजोळी पाठवून पती-पत्नीने जीवन संपविले. या घटनेनंतर दोन्ही मुले पोरकी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
भाऊराव सोनाळे आणि वैशाली सोनाळे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील रहिवासी होते. २० वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. तिथे काम करून ते स्थायिक झाले होते. त्यांना दोन मुले असून एकाने बारावीची तर दुस-याने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्याने दोघेही आजोळी नांदेडला गेले होते. १ मे रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. त्यानंतर वैशालीने राहत्या घरी गळफास घेतला. त्यानंतर पत्नीच्या मृत्यूला मला दोषी ठरवतील, या भीतीने भाऊरावनेही २ मे रोजी मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपविले.