नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पंतजलीला दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला असून पंतजली आयुर्वेदकडून डाबर च्यवनप्राश बद्दल जी जाहिरात केली जात आहे त्यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. डाबर च्यवनप्राशबद्दल जी दिशाभूल करणारी आणि नकारात्मक जाहिरात केली जात आहे, ती बंद करा असे न्यायालयाने पंतजलीला सांगितले.
डाबर इंडियाने पंतजली आयुर्वेद विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंतजली आयुर्वेद त्यांच्या जाहिरातींमधून डाबर च्यवनप्राशबद्दल चुकीची माहिती देत असून बदनाम करत आहे. ग्राहकांची डाबर च्यवनप्राशबद्दल दिशाभूल करत आहेत असे आरोप याचिकेतून करण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने डाबर इंडियाला दिलासा दिला. याचिका स्वीकारताना पंतजलीला डाबर च्यवनप्राशबद्दलच्या जाहिरात बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पंतजलीकडून जी जाहिरात केली जात आहे, त्यात डाबर च्यवनप्राशला लक्ष्य केले जात आहे. डाबर इंडियाने याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले. डाबर च्यवनप्राश साधारण असून पंतजली च्यवनप्राशमध्ये ५१ पेक्षा अधिक आयुर्वेदिक जडीबुटी असल्याचा दावा जाहिरातीतून केला जात आहे. प्रत्यक्षात त्यात ४७ घटकच आहेत. पंतजलीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळून आलेला आहे जो मुलांसाठी घातक आहे, असेही डाबरने न्यायालयाला सांगितले.