परभणी : दिवाळी लक्ष्मीपूजन आज घरोघरी व दुकानांमध्ये साजरे होणार आहे. या अनुषंगाने लक्ष्मीपूजन साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी रविवार, दि.८ नोव्हेंबर रोजी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. दिवाळी लक्ष्मीपुजनासाठी आवश्यक असलेले केळीचे खांब, झेंडूची फुले, कमळ फुले बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. याशिवाय प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली असून या सर्वच ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारपेठेत गर्दीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
दिवाळी सण म्हटले की लाडू, करंजी, चकली, अनारसे, चिवडा अशा पदार्थांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. त्यामुळे बच्चेकंपनी, जेष्ठ नागरिकांसह महिला दिवाळी सणाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. विशेषत: महिलांना या दिवाळीच्या निमित्ताने माहेरी जाण्यास मिळत असल्याने त्या या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीतील लक्ष्मीपूजन आज रविवारी साजरे होणार आहे. या सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शहरातील गांधी पार्क भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी झेंडुची फुले, प्रसाद तसेच सजावटीचे साहित्य खरेदी केले. व्यापा-यांनी दुकानांसमोर लावण्यासाठी केळीचे खांब, फुलांचे तोरण तसेच विविध आकर्षक रंगातील विजेच्या लाईटींग खरेदीसाठी गर्दी केल्याने बाजारपेठेतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल पहावयास मिळाली. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण अनुभवयाला मिळाले.
लक्ष्मीपूजन सणाच्या निमित्ताने परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागात देखील नागरिकांमध्ये उत्साह पहायला मिळाला. झेंडुची फुले या सणासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीस आली असून जवळपास ८० रुपये किलो दर मिळाल्याने शेतक-यांच्या चेह-यावर समाधान पहावयास मिळाले. याशिवाय नागरिकांनी मिठाईच्या दुकानांमधून देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे लक्ष्मीपूजन साहित्यासह प्रसाद, मिठाई व शोभेच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
















