33 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणी १५०० रुपयांत खुश आहेत

लाडक्या बहिणी १५०० रुपयांत खुश आहेत

मंत्री नरहरी झिरवळ यांचा दावा विरोधक विनाकारण अट्टाहास करतात

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्वाचे वक्तव्य केले असून १५०० रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खूश आहेत. २१०० रुपये देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची १५०० रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. ही रक्कम २१०० रुपये करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी २१०० रुपये कधी मिळणार? त्याची वाट पाहत आहे.

जळगावात माध्यमांसोबत बोलताना मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. यापूर्वी विरोधक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देखील देणार नाहीत, असा दावा करत होते. मात्र पंधराशे रुपये दिल्यानंतर विरोधकांनी आता २१०० रुपयांवर जास्त जोर धरला आहे. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. महिला पंधराशे रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत.

नवीन लोकांना संधी मिळावी
नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत नरहरी झिरवळ यांनी सांगितले की माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार यावर निर्णय घेतील. मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देण्याबाबत त्यांचे चांगले धोरण आहे.

दोन नंबरचा व्यवसाय केल्याने परिणाम होतो
दोन नंबरचा व्यवसाय केला तर टायरमध्ये गेलाच म्हणून समजा, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर झिरवळ म्हणाले, दोन नंबरचा व्यवसाय केल्याने इतरांवर परिणाम होतो. त्यामुळे कदाचित यासंदर्भात अजित पवार बोलले असतील. यासंदर्भात मी ऐकले नाही, मात्र चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या बातम्या सुरू आहेत. याबद्दल आम्हाला बातम्यांमधून माहिती मिळते आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR