22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeराष्ट्रीयरेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली, बचावकार्य सुरूच

रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली, बचावकार्य सुरूच

विजयनगरम : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांपैकी ७ जणांची ओळख पटवण्यात आली असून इतरांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे, अशी माहिती विजयनगरमच्या एसपी दीपिका यांनी दिली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजरने विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजरला पाठीमागून धडक दिली. मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अद्यापही बचावकार्य सुरूच आहे.

पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार हावडा-चेन्नई मार्गावरील अलमांडा आणि कंटकपल्ली स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. या धडकेमुळे पलासा पॅसेंजरचे इंजिन तसेच रायगड पॅसेंजरचे शेवटचे दोन डबे रुळांवरून घसरले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद दुर्घटनास्थळी पोहोचले असून आपत्कालिन पथकही दाखल झाले. घसरलेले डबे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम किनारा रेल्वेने हेल्पलाईन सुरू केली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेलाही याची माहिती देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याच्या अधिका-यांना बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्याची सूचना केली आहे.

अनेक रेल्वे गाड्या रद्द
प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम-रायगड ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केल्यामुळे हा अपघात झाला आहे. म्हणजेच मानवी चुकीमुळे हा अपघात घडला आहे. रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने (पूर्वीचे ट्विटर) वर दिली. पूर्व किनारपट्टी रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, सोमवारी एकूण १८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून २२ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, रेल्वे अधिकारी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांच्यात संवाद झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR