26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून

माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून

छगन भुजबळांचे नाशिकमधून लढण्याचे संकेत

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे प्रचाराचा नारळ फोडत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. माझ्या उमेदवारीची मलाही कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी मला माझ्या उमेदवारीची माहिती दिली, असा दावा करत भुजबळांनी नाशिकच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

भुजबळ म्हणाले की, उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रहही नव्हता. दिल्लीतील बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली. मला बोलविण्यात आले. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला यायला निघालो. तेव्हा मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मला नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुम्हालाच उभे राहावे लागेल असे सांगितले.

माझे नाव उमेदवारीसाठी अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरू झाली. त्यावेळी ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली त्यामुळे अधिकच चर्चा सुरू झाली. या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा फार आग्रह आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य राहील. महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत, असे नमूद करत महायुतीकडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा सुटली, तर राष्ट्रवादीच्या घड्याळ या निशाणीवरच मी निवडणूक लढवेल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

तर मराठा उमेदवारांविरोधातही बोर्ड लागतील!
मराठा समाजाकडून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंगविरोधातही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मी मराठ्यांना कधीच विरोध केला नाही. मराठा समाजाला ओबीसीमध्ये नको तर स्वतंत्र आरक्षण द्या, इतकीच माझी भूमिका आहे. ही माझी चूक असेल तर ती मी केली आहे. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या, पंकजा मुंडे यांना अडवले, त्या तर काहीच बोलल्या नव्हत्या, प्रणिती शिंदे या कधी मराठा समाजाविषयी बोलल्या का.. मग त्यांना विरोध का केला? त्या वंजारी दलित आहेत म्हणून का? असा सवाल करत अशा प्रकारचे होर्डिंग लावून मराठा समाजाचेच नुकसान होणार आहे. राज्यभर चांगले मराठा नेते आहेत. मग त्यांच्या विरोधातही होर्डिंग लागतील, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

हेमंत गोडसेंना टोला!
उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसताना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला. याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले की, उमेदवारीविषयी वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरू केला, हे चांगलेच आहे. महायुतीचा उमेदवार जो असेल, त्याला त्याचा फायदाच होईल, असा टोला भुजबळ यांनी गोडसेंना लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR