नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी(सीजेपी) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांचे एक डीसीपी पत्रकार परिषदेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख साहब असा करताना दिसत आहेत. यावरून त्यांनी, पोलिस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारे वागतात, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, हा व्हीडीओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले असून हा व्हीडीओ वर्षभरापूर्वीचा आणि केवळ जिभेवरून निसटलेला शब्द असल्याचा दावा केला आहे.
विद्यार्थी, आंदोलकांना एक न्याय आणि गुंडांना दुसरा?
अभिजित दिपके यांनी सोमवार (१९ ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर व्हीडीओ पोस्ट करत पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, लॉरेन्स बिश्नोई साहब… दिल्ली पोलिसांच्या मनात गुंडांबद्दल किती आदर आहे, हेच यावरून दिसून येते. हक्कासाठी आणि विरोधासाठी रस्त्यावर उतरणा-या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना जर पोलिसांनी याच्या १० टक्के जरी सौजन्याची वागणूक दिली असती, तरी खूप झाले असते.
पोलिसांनी ख-या गुन्हेगारांना रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे
दिपके यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी ख-या गुन्हेगारांना रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. सरकार आणि पोलिसांचे प्राधान्य नेमके कशाला आहे, हेच या घटनेवरून स्पष्ट होते.
पत्रकार परिषदेत नेमके काय घडले होते?
दिपके यांनी शेअर केलेला व्हीडीओ हा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेचा आहे. व्हीडीओत संबंधित पोलिस अधिकारी म्हणताना ऐकू येत आहेत की, बघा, या गोष्टीची पुष्टी मी स्वत: करू शकत नाही. पण जो फोन आला होता, त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई साहब असे नाव घेण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांची सारवासारव
हा व्हीडीओ वेगाने पसरल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, हा व्हीडीओ जुना असून संबंधित अधिका-याच्या तोंडातून तो शब्द नकळत उच्चारला गेला होता (‘स्लिप ऑफ टंग’). दरम्यान, या व्हीडीओमधील संबंधित अधिकारी आता पदोन्नती मिळवून अतिरिक्त पोलिस आयुक्त झाले आहेत.
















