टोरंटो : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचलेला असतानाच कॅनडातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये संसदेची निवडणूक पार पडली असून मार्क कार्नी हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. या निवडणुकीत खलिस्तानी समर्थक बडा नेताही पराभूत झाला आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडातील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा डोके वर काढले आहे.
कॅनडातील ८ लाख हिंदूंना बाहरे काढून परत भारतात पाठविण्याची मागणी खलिस्रानवाद्यांनी केली आहे. कॅनडातील टोरांटो येथील माल्टन गुरुद्वारामध्ये हिंदू विरोधी रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खलिस्तानी समर्थकांनी हिंदूंना भारतात परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे पिंज-यात बंद करण्यात आलेले पुतळेही होते. मात्र, कॅनडामध्येच या रॅलीवरून रोष व्यक्त केला जात आहे. येथील पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी रविवारी हा व्हीडीओ सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले की, आपल्या रस्त्यांवर जिहादी लोक उन्माद करत आहेत. ख्रिश्चन समाजाल धमकावत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत.
मार्क कार्नी यांचा कॅनडा जस्टिन ट्रूडो यांच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का?, असा सवाल बोर्डमन यांनी केला आहे. त्यांच्या पोस्टनंतर शॉन बिंदा नावाच्या एका यूझरनेही या रॅलीवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माल्टर गुरूद्वारामध्ये के-गँगने ८ लाख हिंदूंना भारतात पाठविण्याची मागणी केली आहे. त्रिनिनाद, गयाना, सूरीनामा, जमैका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, केनिया आणि इतर अनेक ठिकाणी हा समुदाय आहे.
खलिस्तान दहशतवाद्यांच्या समुहाचा हिंदूविरोधी द्वेष
हा भारत सरकारचा विरोध नव्हे तर खलिस्तान दहशतवाद्यांच्या समुहाचा हिंदूविरोधी द्वेष आहे. हा समूह १९८५ मधील एअर इंडियाच्या बॉम्बस्फोटासारख्या कॅनडातील सर्वात घातक हल्ल्यांसाठी कुख्यात आहे. तरीही उघडपणे द्वेष पसरवत आहेत असे म्हणत बिंदा यांनी या रॅलीतील लोकांना खलिस्तानी दहशतवादी म्हटले आहे. दरम्यान, कॅनडामध्ये यापूर्वी अनेकदा हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. तसेच ट्रुडो यांच्या काळात दोन्ही देशांतील संबंध खलिस्तान्यांना दिलेल्या आश्रयावरून अधिक ताणले गेले आहेत.