मुंबई : विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने सुरू होणा-या देवाभाऊ टॅक्सी योजनेमागे मोठा भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था मर्यादित’ ही एक बोगस संस्था आहे. ही संस्था ४ डिसेंबर २००१ रोजी स्थापन झाली, पण गेल्या २५ वर्षांत त्यांच्याकडे एकही गाडी नाही, कोणतीही उलाढाल नाही किंवा त्यांनी कधीही संस्थेची निवडणूक घेतलेली नाही. २०१८ मध्ये निवडणूक का घेतली नाही? या प्रश्नावर संस्थेने, २०१८ साली कोविडमुळे लॉकडाऊन होता’ असे खोटे आणि हास्यास्पद कारण लेखी स्वरूपात दिल्याचे दमानिया यांनी उघड केले. या संस्थेतील २८ सदस्यांच्या सह्या बोगस असल्याचा संशय आहे. एकाच व्यक्तीची २००१ मधील सही मराठीत आणि २०१३ मधील सही स्टायलिश इंग्रजीत असल्याचे त्यांनी समोर आणले. ही संस्था ‘क’ श्रेणीमध्ये मोडते आणि २०२३-२४ मध्ये तिचा निव्वळ नफा फक्त ९४१ रुपये होता.
खात्यात शून्य रक्कम, तरीही २ हजार गाड्यांसाठी कर्ज
संस्थेची आर्थिक स्थिती इतकी बिकट असताना आणि त्यांच्या मुंबई बँकेतील खात्यात सध्या शून्य रुपये शिल्लक असताना, प्रवीण दरेकर यांनी या संस्थेला मुंबई बँकेकडून २ हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. हा पैसा सामान्य कष्टकरी लोकांचा आणि सहकारी संस्थांचा असून तो या बोगस संस्थेसाठी वापरला जात आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.
राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने भारत टॅक्सी योजना सुरू केली असून, महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणे गरजेचे होते. मात्र, अमित शहांची भारत टॅक्सी डावलून या योजनेला देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ टॅक्सी असे नाव देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे उदात्तीकरण करण्यासाठी आणि सरकारी कामात कुठेही अडवणूक होऊ नये म्हणून हे नाव दिले गेले आहे. ओला-उबरला पर्याय म्हणून टॅक्सी सेवा येणे गरजेचे आहे, पण त्याला सामान्यांची टॅक्सी किंवा महाराष्ट्र टॅक्सी असे नाव द्यावे, देवाभाऊ टॅक्सी हे नाव आम्हाला मान्य नाही असे दमानिया म्हणाल्या.
















