38.9 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाधोनीच्या २० धावा महागात; मुंबईचा पराभव

धोनीच्या २० धावा महागात; मुंबईचा पराभव

रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पैसा वसूल खेळ पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील महेंद्रंिसग धोनीने खेळलेली ती शेवटची ४ चेंडू आणि त्यानंतर रोहित शर्माचे शतक… या सामन्यात क्रिकेट प्रेमींना सर्वकाही मिळाले. त्यामुळेच या सामन्यात कोण जिंकले, कोण हरले यापेक्षा दोन दिग्गजांच्या खेळीने बाजी मारली हे महत्त्वाचे ठरले. सीएसकेच्या २०६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने सुरुवात दमदार केली होती. पण, सातव्या षटकानंतर मथिशा पथिराणाने सामना फिरवला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात दोन धक्के दिले, तरीही रोहीत मैदानावर शड्डू ठोकून उभा होता. पण, आजचा दिवस पथिराणाचा होता.

इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. मथिशा पथिराणाने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला ( २३) माघारी पाठवले. त्याच षटकात पथिराणाच्या बाऊन्सरवर सूर्यकुमार यादवने अपर कट मारला खरा, परंतु मुस्ताफिजूर रहमानने चतुराईने झेल टिपला. रोहित शर्मा मैदानावर उभा राहिला आणि त्याने या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० हून अधिक चौकार व ५०० हून अधिक षटकार खेचणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा फलंदाज आहे. ख्रिस गेलने ११३२ चौकार व १०५६ षटकार खेचले आहेत, तर रोहितच्या नावावर १०२५* चौकार व ५००* षटकार आहेत.

रोहितची फटकेबाजी पाहून सीएसकेचे चाहते चिंतेत पडले. त्याला तिलक वर्माने खणखणीत साथ देताना ३८ चेंडूंत ६० धावा जोडल्या. पथिराणाने एमआयला तिसरा धक्का देताना तिलकला ३१ ( २० चेंडू, ५ चौकार) धावांवर माघारी पाठवले. तिलक माघारी परतला तेव्हा मुंबईला ३६ चेंडूंत ७७ धावा हव्या होत्या. तेव्हा शार्दूल ठाकूरने १६व्या षटकात २ धावा देताना सामना सीएसकेच्या बाजूने झुकवला. त्यात १७ व्या षटकात तुषार देशपांडेने ३ धावा देत हार्दिक पांड्याची ( २) विकेट मिळवली. एमआयच्या पारड्यात असलेला सामना या दोन षटकांनी सीएसकेच्या बाजुने झुकताना दिसला.

टीम डेव्हिडने दोन दणदणीत षटकार खेचले खरे, परंतु मुस्ताफिजूर रहमानने त्याला ( १३) बाद केले. डेव्हिड बाद झाला तेव्हा २१ चेंडूंत ५८ धावा मुंबईला करायच्या होत्या. रोहितच्या खांद्यावर जबाबदारी होती आणि मागील सामन्यातील स्टार रोमारिओ शेफर्ड त्याला साथ देईल असे वाटलेले. पण, पथिराणा ऐकायला मानत नव्हता आणि भन्नाट चेंडूवर शेफर्डचा ( १) त्रिफळा उडवला. पथिराणाच्या त्या षटकात ६ धावा गेल्या, परंतु १ विकेट मिळाली. १२ चेंडूंत ४७ धावा मुंबईला करायच्या होत्या. मुस्ताफिजूरच्या त्या षटकात १३ धावा आल्या आणि आता ६ चेंडू ३४ धावा असा सामना सीएसकेच्या पारड्यात झुकला. मोहम्मद नबी स्ट्राईकवर राहिल्याने टक चा पराभव पक्का झाला.

रोहितने चौकार खेचून ६१ चेंडूंत शतक पूर्ण केले. पण, २ चेंडूंत २५ धावा अशक्य होत्या. चेन्नईने हा सामना २० धावांनी ंिजकला. मुंबईला ६ बाद १८६ धावा करता आल्या. रोहित ६३ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, धोनीने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा कुटल्या व सीएसकेला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याआधी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिस-या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR