30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरकरमाळ्यात नारायण पाटील तुतारी हातात घेणार

करमाळ्यात नारायण पाटील तुतारी हातात घेणार

सोलापूर : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून माढा लोकसभा मतदारसंघात जबरदस्त राजकीय हालचाली होत आहेत. राज्याचे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी स्वत: शरद पवारांनी अकलूज या ठिकाणी येत शिवरत्न बंगल्यावर जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेत १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. भारतीय जनता पार्टी आपल्या भूमिकेवर ठाम असून रणजितसिंह नाईक निंबाळकरच भाजपचे उमेदवार असतील, असा पवित्रा घेतल्याने माढ्याचा तिढा अवघड होत चालला आहे.

१४ एप्रिल रोजी करमाळ्याचे माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात कार्यरत असलेले नारायण पाटील यांनी शिवसेना सोडत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. करमाळ्यातील संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात जाऊन लोकसभेसाठी तुतारीचे काम करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मी गेली १० वर्षे मोहिते पाटील यांच्यासोबत आहे. माढा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहणार आहे. नारायण पाटील यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला करमाळा तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे करमाळा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार नारायण पाटील २६ एप्रिल रोजी करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती घेणार असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.

करमाळ्यात संजय मामा शिंदे अपक्ष आमदार असले तरी त्यांची अजित पवारांशी जवळीक आहे. शिवाय त्यांचे बंधू माढाचे आमदार बबनदादा शिंदे हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या संजय कोकाटे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांना बळ दिले होते. आता नारायण पाटील यांच्या प्रवेशाने भाजपच्या उमेदवाराची ताकद कमी झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR