सोलापूर : प्रतिनिधी
सध्या मुलींची संख्या कमी झाल्याने मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला असून शहरी वग्रामीण भागातही मुलांची लग्ने जमत नसल्याने त्यांचे कुटुंबीयही हवालदील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लग्नाळू मुलांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मोर्चा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. या परिस्थीतीचा फायदा घेत बोगस वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून लग्नाळू वर आणी त्यांच्या कुटुंबीयांना बोगस लग्न लावून लुटणारी टोळी निर्माण झाली असून जिल्ह्यात अशी प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात उघडकीस आली. लग्न सोहळ्याचा विधी आनंदात पार पडला. दोन दिवसांच्या कालावधीनंतर सत्यनारायणाची पूजा करण्याची धांदल सुरू होती. उशिरा लग्न झालेल्या नवरदेव मधुचंद्राच्या रात्रीची स्वप्न पाहत असतानाच नवरी दागिन्यांसह किंमती मोबाईल घेऊन पळून गेली.
लग्न जुळविण्यासाठी सुस्ते (ता. पंढरपूर) येथील एका एजंटाने लाखो रूपयांचा मलिदा उकळून हे लग्न जमवले होते. याबाबत सोलापूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याचे वृत्त आहे. मुळचे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील एक कुटूंब उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात स्थाईक झाले आहे. मुलाचे लग्न जमत नव्हते. एजंटाने लाखो रूपये घेऊन लग्नाच्या रेशीमगाठी जुळवून देतो. देखणी व सुसंस्कृत नवरी मिळवून देतो, अशा भुलथापा मारत एका एजंटने लातूर भागातील एक स्थळ दाखवत लग्नही जुळवले. उशिरा लग्न होत आहे म्हणून नवरोबाच्या नातलगांनी घाईने लग्नविधी उरकून घेतला. त्या आनंदी सोहळ्याचे फोटो व व्हीडीओ नव-याने व नातलगांनी सोशल मीडियावरही झळकावले.
उशिरा लग्न होऊनही सुंदर नवरी मिळाल्याने नवरा भलताच आनंदात होता. पण हा आनंद दोन ते तीन दिवसांत पार मावळला. लग्न घाईत उरकून घेतल्याने सत्यनारायणांची पूजा घेऊन राहिलेल्या नातलगांना मित्रमंडळींना आमंत्रित करून जेवणाचा व सन्मान सोहळ्याचा बेत आखलेला. यासाठी कुटुंबातील लोकांची धांदल व धावपळ बघून मोका साधत अंगावरील दागिने व नव-याचा किंमती मोबाईल घेऊन नव्या नवरीने पोबारा केला. सुस्ते गाव गाठत त्यांनी एजंटाला गाठला त्याला बेदम चोपला व त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही सगळी बोगसगिरी असल्याचे आढळून आले आहे.
काहीही पार्श्वभूमी माहिती नसताना लग्न जुळायला लागली. त्यातली काही यशस्वी झाली आणि बरीच फिसकटली. लग्नाचे वय उलटून गेलेली, नोकरी- व्यवसायात स्थिर नसलेली, रंगरूपाने डावे असलेली, घटस्फोट-विधवा-विधूर असलेली माणसे फसवली जात आहेत. हे प्रकार वाढू लागले आहे. आता शुभमंगल करायचे असेल तर सावधान, या चर्चला सुस्ते गावात उधाण आले आहे. अशा घटना परत घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने फसवी लग्न जुळवून देणा-या टोळीचा पर्दाफाश करावा व एजंटाना लागली अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे.
वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून लातूर भागातील काही भामटे सोलापूर जिल्ह्यातील काही तरूणांची लग्ने जुळवून देण्याची टोळी निर्माण झाली आहे. लग्नाला आसूसलेल्या सावजाला हेरून ही टोळी लाखो रूपयांचा मलिदा उकळून अशी लग्ने जुळवून देत असल्याच्या अनेक घटना सोलापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. या टोळीत देखण्या तरूणी व महिलांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे.