नागपूर/कोच्ची : देशभरात धुमाकूळ घालणा-या डिजिटल अरेस्ट प्रकरणातील एका मोठ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. केरळमधील एका ज्येष्ठ महिलेची १ कोटी ८६ लाख रुपयांची फसवणूक करणा-या या टोळीतील तीन मुख्य सूत्रधारांना विविध राज्यांतून अटक करण्यात आली. या कारवाईसाठी सीबीआयने महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणामध्ये एकाच वेळी छापेमारी केली.
सीबीआयने या कारवाईत अटक केलेल्या तीन आरोपींची भूमिका महत्त्वाची होती. ब्लेसीन अब्राहम याला गोव्यातून अटक करण्यात आली. हा प्रामुख्याने म्युल बँक खाती हाताळणे आणि फसवणुकीचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. तर मोहम्मद मुश्ताकला नागपूरमधून ताब्यात घेतले. त्याने एक शेल कंपनी उभी केली होती, ज्याचा वापर गुन्ह्यातून मिळालेला पैसा स्वीकारण्यासाठी केला जात असे. तर मोहम्मद जुनैदला बंगळुरूतून अटक करण्यात आली. तो फसवणुकीसाठी लागणारी सीम कार्ड अवैध मार्गाने मिळवून देत असे.
५-जी अपग्रेडच्या नावाखाली केवायसीची चोरी
आरोपी मोहम्मद जुनैदची मोडस ऑपरेंडी अत्यंत भयानक होती. तो सर्वसामान्यांना तुमचे सीम कार्ड ५-जी मध्ये अपग्रेड करून देतो असे आमिष दाखवत असे. या बहाण्याने तो लोकांकडून त्यांची केवायसी कागदपत्रे मिळवायचा आणि त्या आधारे नवीन सिमकार्ड चालू करायचा. ही कार्डे नंतर परदेशातून चालवल्या जाणा-या सायबर क्राईम रॅकेटसाठी वापरली जात होती.
देशव्यापी छापेमारी आणि जप्ती
सीबीआयने या कारवाई दरम्यान नागपूर, गोवा, बंगळुरू, पलक्कड, हैदराबाद आणि दिल्ली येथे छापेमारी केली. या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, डेबिट कार्ड, बँक खात्यांची कागदपत्रे आणि अनेक सिम कार्डे जप्त करण्यात आली आहेत.
नेमके प्रकरण काय?
केरळमधील कोट्टायम येथील एका ६८ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवली होती. तुम्ही मोठ्या गुन्ह्यात अडकले आहात, असे सांगून त्यांना तासनतास व्हीडीओ कॉलवर बसवून ठेवण्यात आले आणि त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ८६ लाख रुपये उकळण्यात आले.

