36.1 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रदीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला

दीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला

लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठींचा भीमपराक्रम देशभरातून कौतुकाचा वर्षाव

पुणे : भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी ‘आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन’ म्हणजेच ‘एएमएआर’ अमर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा कोर्स पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग(एआयपीटी) मध्ये असतो. भारतीय लष्करातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कोर्सेसमध्ये याची गणना होते. यामध्ये शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरतेचीही मोठी परीक्षा घेतली जाते.

दीक्षा त्रिपाठी यांनी हे खडतर प्रशिक्षण केवळ पूर्णच केले नाही, तर त्यात उत्कृष्ट कामगिरीही बजावली. लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने त्यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि संयमाच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. सध्या त्यांची नियुक्ती लडाखसारख्या आव्हानात्मक भागात आहे, यावरून त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्करात महिलांची भूमिका वेगाने विस्तारत आहे.

पॅराशूट जंपिंग, लांब धावणं आणि सागरी मोहिमांमध्ये महिला अधिकारी आपले वर्चस्व सिद्ध करत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये मेजर दीक्षा सी. मुदुदेवन यांनीही बलिदान बॅज मिळवून इतिहास रचला होता. आज महिला अधिकारी आर्टिलरी (तोफखाना) आणि आर्मी एव्हिएशन यांसारख्या कॉम्बॅट सपोर्ट विभागांत कार्यरत आहेत. जरी अद्याप इन्फंट्री आणि आर्मर्ड कोरमध्ये त्यांची एन्ट्री झालेली नसली, तरी इतर सर्व क्षेत्रांत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. लेफ्टिनेंट दीक्षा त्रिपाठी यांचे हे यश केवळ एक वैयक्तिक कामगिरी नसून स्वप्न पाहणा-या आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणा-या प्रत्येक महिलेसाठी एक मोठी प्रेरणा आहे.

काय आहे ‘अमर’ कोर्स?
‘अमर’ कोर्सची सुरुवात २०२३ मध्ये झाली होती. भारतीय सैन्यासाठी एक आधुनिक कॉम्बॅट सिस्टम म्हणून हा कोर्स विकसित करण्यात आला आहे. सैनिकांना समोरासमोरील लढाईसाठी अधिक सक्षम बनवणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. या ट्रेनिंगमध्ये शस्त्राशिवाय लढाई, शस्त्रास्त्रांचा वापर, स्टॅमिना वाढवणे आणि मानसिक मजबूतीवर विशेष भर दिला जातो. अचानक उद्भवणा-या युद्धाच्या परिस्थितीत, जिथे शस्त्रे त्वरित उपलब्ध नसतील, अशा वेळी शत्रूचा सामना कसा करावा, याचे ट्रेनिंग येथे दिले जाते. विशेष म्हणजे अतिउंचीवरील भागांतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन या ट्रेनिंगची रचना करण्यात आली आहे.