36.8 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमनोरंजनदिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणा-या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली. या वर्षीचा चित्रपट क्षेत्रातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर करण्­यात आला आहे. हा पुरस्कार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक यासह दिला जातो.

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. तसेच, १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे. या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR