धाराशिव : लोकप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने धाराशिव तालुक्यातील एकल महिलांच्या ५५ पाल्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आले. या महिला घरगुती कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. करतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासासाठी व कुटुंबासाठी त्या धाराशिव येथे भाड्याने रूम घेऊन राहतात. शाळेतून पाठ्यपुस्तके दिली जातात पण वर्षभर दफ्तर, पेन, पेन्सील, कंपास, वह्या, रजिस्टर मिळत नाही. ही त्यांची गरज लक्षात घेऊन असे संच या वेळी त्यांना देण्यात आले. लोकप्रतिष्ठान संस्था, रोटरी क्लब आणि देणगीदारांनी या कामाला आर्थिक सहकार्य केले.
एकल महिलांच्या प्रतिनिधी कांता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. अनिकेत देशमूख यांनी या महिलांना मुलांच्या संगोपनासाठी पोटगी मिळवून देण्यासाठी मदत करणार असे सांगून कायदेविषयक माहिती दिली. लोकप्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुरेखा जगदाळे यांनी एकल महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन आर्थिक साहाय्य कसे आणि कोठून मिळते या संदर्भात माहिती दिली. रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजित रणदिवे यांनीही या महिलांना सहकार्य करू, असे सांगितले. डॉ तबसूम सय्यद यांनी मुलांना चांगले शिक्षण द्या, असे सांगून पुढील शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सुदेश माळाळे, अनिकेत देशमुख सुजितकुमार चंदनशिवे, सुनील बडूरकर यांनी सहकार्य केले.