नागपूर : भाजप महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे वारंवार उघड झाले आहे. शेतक-याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आणि आता राज्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. माणिकराव कोकाटे यांचे शेतक-यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजपा महायुतीचे सरकारच भिकारी आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोध असून फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे. सरकार १ रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतक-यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सरकार शेतक-यांच्या शेतमालाला भाव देत नाही. कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतक-यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजपा महायुतीने मतांची भीक मागितली. शेतक-यांना शेतीसाठी लागणा-या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतक-यांकडूनच भीक घेते आणि वरून शेतक-यांनाच भिकारी म्हणते, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.
दरम्यान, शेतक-यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय कशी मलई खाते याचा पर्दापाश नुकताच आम्ही केला. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतक-यांचा अपमान करणा-या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांची जाहीर माफी मागावी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.