40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकेसाने गळा कापू नका

केसाने गळा कापू नका

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या अत्यंत कमी जागा सोडण्याची भूमिका घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महायुतीला तणाव वाढला आहे. शिवसेना नेते (शिंदे गट) रामदास कदम यांनी भाजपावर थेट हल्ला चढवताना, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका, असे सुनावले तर शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हालाही मिळाल्या पाहिजेत. मोदी लाटेतही यश मिळवणा-यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा) नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

निवडून येण्याची क्षमता याच एकमेव निकषावर जागावाटप होईल, असे सांगत भाजपाने ३३ जागांवर हक्क सांगितला असून शिवसेना व राष्ट्रवादीत मिळून १५ जागा सोडण्यात येतील, असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत १३ विद्यमान खासदार असताना तेवढ्याही जागा मिळत नसल्याने शिंदे गटात कमालीची नाराजी आहे तर ५-६ जागांवर तडजोड करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आहे. यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मित्र पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपावर आज संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र भाजपा जे काही करीत आहे ते अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे; परंतु जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका अन्यथा लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवावे, असे रामदास कदम यांनी भाजपाला सुनावले. २००९ मध्ये युती असूनही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडले होते. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असा संताप रामदास कदम यांनी व्यक्त केला.

कदमांना टोकाचे बोलण्याची जुनी सवय – फडणवीस
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; पण उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांचा संताप अदखलपात्र केला. रामदास कदम यांना मी बरीच वर्षे ओळखतो. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची, टोकाचं बोलण्याची त्यांची सवय आहे. भाजपाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीही आमच्या बरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्या बरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे. आमच्या बरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सगळ्यांचा योग्य सन्मान ठेवू. आता ठीक आहे अनेक लोक लक्ष वेधून घेण्यासाठी बोलतात. ते फार गांभीर्याने घेऊ नये, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी शिवसेने इतक्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता कुणी काहीही मागायला हरकत नाही; परंतु निर्णय वास्तविकतेच्या आधारित होईल, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. महायुतीत जागावाटपाबाबत गंभीर मतभेद नाहीत. २ ते ३ जागांवर चर्चा सुरू असून जागावाटप लवकर मार्गी लावले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR