नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने व्याजदर निश्चित करताना त्यातून अन्न चलनवाढीला वगळू नये असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदर निश्चित केले जाताना अन्न चलनवाढ विचारात घेतली जाणार नाही, अन्न चलनवाढ विचारात न घेताच हे व्याजदर ठरवले जातील, अशी चर्चा असल्यामुळे रघुराम राजन यांनी हे विधान केले आहे. असे केल्यास लोकांचा रिझर्व्ह बँकेवरील विश्वास कमी होईल.
कारण केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला चलनवाढ आटोक्यात ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. सन २०२३-२४ च्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये व्याजदर निश्चित करताना अन्नधान्य चलनवाढ वगळावी, अशी सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अन्नधान्यावरच चलनवाढ अवलंबून असावी. कारण त्यावरच ग्राहकांचा चलनवाढीसंदर्भातील समज अवलंबून असतो, असेही रघुराम राजन म्हणाले. मी गव्हर्नर असताना आम्ही प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स (पीपीआय) वर लक्ष ठेवून होतो. मात्र आता, सर्वसामान्यांना काय सहन करावे लागते, त्याच्याशी ‘पीपीआय’चा संबंध नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
त्यामुळे पीपीआय वर लक्ष ठेवून चलनवाढ कमी झाल्याचे रिझर्व्ह बँक म्हणत असली, तरी ग्राहकांचा अनुभव जर वेगळा असला, तर चलनवाढ कमी झाल्याच्या विधानावर त्यांचा विश्वासच बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘समजा चलनवाढीला कारणीभूत असलेले काही महत्त्वाचे मुद्दे त्यातून वगळले आणि चलनवाढ आटोक्यात असल्याचे लोकांना सांगितले. पण त्याचवेळी अन्नधान्याचे भाव गगनाला भिडत असले किंवा अन्य काही वस्तूंचे भाव वाढत असले व त्या गोष्टींचा समावेश चलनवाढ ठरवताना केला नाही, तर लोकांना रिझर्व्ह बँकेवर विश्वास राहणार नाही असे राजन म्हणाले.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठरवताना अन्नधान्य चलनवाढीचा विचार करू नये, अशी शिफारस मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी इकॉनॉमिक सर्वेमध्ये केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा अन्नधान्याच्या किमतीशी काहीही संबंध नाही. मागणी व पुरवठा यांच्यावर अन्नधान्याच्या किमती अवलंबून असतात असे कारण देऊन नागेश्वरन यांनी ही शिफारस केली आहे. मात्र राजन यांना ती मान्य नाही.
दर दोन महिन्यांनी ठरतात व्याजदर
रिझर्व्ह बँकेतर्फे दर दोन महिन्यांनी होणा-या बैठकीत ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करून व्याजदर ठरवले जातात. या निर्देशांकात अन्नधान्य, इंधन, कंपन्यांमध्ये उत्पादित होणा-या वस्तू आणि काही विशिष्ट सेवा यांचे दर विचारात घेतले जातात.