34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाडबल धमाका!

डबल धमाका!

सुपर सॅटरडेला विश्वकप स्पर्धेतील डबल धमाका बघावयास मिळाला. धरमशालातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझिलंडवर पाच धावांनी थरारक विजय मिळवला. हाताला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने धडाकेबाज शतक ठोकून स्पर्धेतील पदार्पण साजरे केले. टॉस जिंकून कांगारूंना प्रथम फलंदाजी देणे न्यूझिलंडच्या अंगलट आले. वॉर्नर-हेडने १७५ धावांची सलामी दिली तेथेच कांगारूंचा विजय पक्का झाला. सलग तिस-या शतकाच्या दिशेने निघालेल्या वॉर्नरचे शतक १९ धावांनी हुकले. इतक्या जबरदस्त सलामीनंतर कांगारूंनी किमान सव्वा चारशे धावांपर्यंत सहज मजल मारावयास हवी होती. परंतु मधली फळी कोसळल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. विशेष म्हणजे किवीज्चा पट्टीचा फिरकी गोलंदाज सँटनर अपयशी ठरल्याने कांगारूंना चारशे धावांची वेस ओलांडणे अवघड नव्हते. सँटनरने १० षटकांत ८० धावा दिल्या होत्या.

अनियमित गोलंदाज ग्लेन फिलिप्सने पहिले तीन बळी घेत कांगारूंच्या धावसंख्येला आळा घालण्यात मोठा वाटा उचलला. ३८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवीजला कॉन्वेने चांगली सलामी दिली. त्याने स्वैर मारा करणा-या स्टार्कला तसेच हॅजलवुड आणि कमिन्सला जबरदस्त चौकार लगावले होते. अखेर हॅजलवुडनेच कॉन्वे-यंग ही सलामी जोडी तंबूत पाठवली. नंतर मिचेलने ४२ चेंडूत अर्धशतक ठोकून धावसंख्येला वेग दिला होता. मिचेलचा एक फटका चुकला आणि लाँगऑनला स्टार्कने आपला तिसरा झेल घेतला. किवीजचा डाव घसरणार असे वाटत असतानाच राचिन रवींद्र संघाच्या मदतीला धावून आला. तीर्थरूपांनी आपले आवडते खेळाडू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील शब्द घेऊन आपल्या पोराचे नाव राचिन ठेवले होते. वडिलांनी ठेवलेले नाव सार्थकी लावत त्याने ७७ चेंडूत शतक ठोकले. स्पर्धेतील त्याचे हे दुसरे शतक. किवीजसाठी तो सचिन तेंडुलकर ठरतोय. राचिन बाद झाल्यानंतर शेवटी नीशामने २४ चेंडूत ४१ धावा काढून आपल्या संघाला विजयासमीप नेले होते परंतु तो बाद झाल्यानंतर किवीजनी विजयासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न पाच धावांनी कमी पडले. या सामन्यात एकूण सातशेच्या वर धावा निघाल्या. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासातील हा नवा विक्रम. सुपर सॅटरडेला दुसरा धमाका केला तो दुबळ्या नेदरलँडने.

नेदरलँडने बांगलादेशला पराभवाचा दणका दिला. २ बाद ४ अशी दारुण स्थिती असतानाही डच संघाने ५० षटके खेळून काढत २२९ धावा जमवल्या. कर्णधार एडवर्डस्चे शानदार अर्धशतक, बारेसीच्या ४१, सीब्रँडच्या ३५ आणि वॅन बीकच्या २३ धावांमुळे डच संघाला आपल्या गोलंदाजांना लढाऊ धावसंख्या देता आली. फलंदाजांनी आपले काम बजावले तसे गोलंदाजांनीही आपले काम चोख बजावले. बांगला देशसारख्या संघाला त्यांनी १४२ धावांत गुंडाळले. डच संघाने ८७ धावांनी विजय मिळवत बांगला संघावर नामुष्कीकारक पराभव लादला. डच संघातर्फे मिकेर्नने सर्वाधिक ४ बळी घेतले. डच संघाचे क्षेत्ररक्षण अफलातून आहे. या संघाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR