24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रडबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. पक्षातून नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. आता चंद्रहार पाटील यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिवसेना उबाठा गटाला सांगलीत खंदा उमेदवार मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मातोश्रीवर सोमवारी पक्षप्रवेश पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

नामर्द पळून जातायत : उद्धव ठाकरे
माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्या विरुद्ध लढण्याची कुणाची छाती होणार नाही. पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत, पण मर्द पक्षात येत आहेत.शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. मी लहान असताना मारुती माने साहेब घरी यायचे, बाळसाहेबांना भेटायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आजदेखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी पक्षात आले.‘अबकी बार चंद्रहार’ पण फक्त घोषणा देऊन चालणार नाही, सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल.

गदा, मशाल मर्दाच्या हातात शोभतात
लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी काय संकेत देणार. जनतेनं एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात. हीच गदा आणि मशाल घेऊन आपल्याला एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. लवकरच सांगलीत येणार. पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारांना आडवं करायचं आहे. हुकूमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे तरणेबाण मर्द पहिलवान शिवसेनेत आले आहेत आणि भविष्य तुमच्या हातात आहे. जनता आपल्याकडे अपेक्षेनं बघते आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

अब की बार ‘चंद्रहार’
यावेळी खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ महाराष्ट्राचा वैभव शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं आहे. ते कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत. हे खासदार की लढायला आले आहेत. चंद्रहार शिवसेनामध्ये सामील होतोय. शिवसेनेच्या मशाली सोबत चंद्रहारची गदा असणार आहे. अब की बार ‘चंद्रहार’ ही तुमची घोषणा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR