छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात आज सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंद ४.५ असल्याचे सांगण्यात आले. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात येत आहे.
या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आले होते.
भूकंपाची खोली १० किलोमीटरच्या परिसरात असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा दुसराही ३.६ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलिकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येते. या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून धक्का जाणवताक्षणी अनेकजण घराच्या बाहेर पडले. काही जुन्या घरांना तडे गेल्याचेही सांगण्यात येत आहे. कोणत्या गावात नुकसान झाले आहे का, याची माहिती एकत्रित केली जात असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाची तीव्रता जाणवल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील ७१० गावांमध्ये गुरुवारी (ता. २१) पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुस-या धक्क्याची ३.६ एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सूचनाही गावपातळीवरील कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत.
२१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली. हिंगोली, वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर होती.
लगेचच नंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमिनीतून आवाज येऊन हादरे बसत असून वारंवार होणा-या या घटना आता गावक-यांनाही नित्याच्या झाल्या आहेत. विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत.
दरम्यान, आज पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्ह्यातील सर्वच ७१० गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तीव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमीअधिक तीव्रता जाणवली. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.
दरम्यान, आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनिटांचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचे गावकरी केशव मुळे यांनी सांगितले. तर पिंपळदरी परिसरातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितले.
यावेळेस हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
प्रशासनाकडून ४.५ ची नोंद असल्याची माहिती
जिल्ह्यात झालेल्या या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली १० किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा धक्का ६ वाजून १० मिनिटांनी बसला असून त्याची ३.६ रिश्टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.