22.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeमहाराष्ट्रअर्थव्यवस्था ५१ लाख कोटींवर

अर्थव्यवस्था ५१ लाख कोटींवर

राज्य ३ वर्षात एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
राज्याने २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपली अर्थव्यवस्था आता ५१ लाख कोटींपर्यंत म्हणजे हाफ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. येत्या ३ वर्षांत जर एखादे दुष्काळी वर्ष आले नाही तर २०२९-३० पर्यंत आपले लक्ष्य साध्य होईल आणि महाराष्ट्र ही जगातील १३ किंवा १४ वी अर्थव्यवस्था झालेली असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानभेत दिली.

देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपेक्षा ३९ टक्के परदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा रोडमॅप तयार असून त्या वाटेवर आपली घोडदौड सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेत गेले दोन दिवस सुरु असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तरात फडणवीस यांनी विरोधी पक्षाची टीका खोडून काढताना राज्य सरकारने आर्थिक क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली.

विरोधी पक्ष संभ्रमित आहे. भ्रमात राहून धावण्यापेक्षा संभ्रमातून बाहेर पडून जर मुद्दे मांडले तर महाराष्ट्राच्या हितात तुमचाही सहभाग वाढेल. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, विकसित भारत याबाबत विरोधी पक्षांच्या मनात फार मोठी गल्लत आहे. तो विषयच त्यांनी समजून घेतला नाही किंवा त्यांना समजला आहे, पण लोकांना संभ्रमित करायचे असल्याने अशा पद्धतीने मुद्दे मांडले जात आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या टीकेचा समाचार घेतला. महाराष्ट्र ही भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जवळपास ३ लाख ६० हजार कोटींचे जीएसटी संकलन आपण करतो. देशाच्या जीडीपीत आपला वाटा आता १४ टक्क्यांच्या आसपास राहिल. आपला उद्देश २०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर तर २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा आहे, याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. राज्यावरील कर्जाचा भारही मर्यादेत असल्याचे त्यांनी सांगितले.

दावोसमुळे राज्यात
गुंतवणूक आली
दावोसमध्ये आता महाराष्ट्राचीही चर्चा होते. २०२५ मध्ये दावोसमध्ये ४८ करार करण्यात आले आहेत. त्यातील ८८ टक्के करार आता अंमलबजावणीच्या विविध पातळीवर आहेत. यात ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. महाराष्ट्राच्या सर्व विभागांत या माध्यमातून गुंतवणूक आली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पाचही जिल्ह्यांत नंदूरबारसहित गुंतवणूक आली.

लोढा मोठे उद्योगपती,
म्हणून दावोसमध्ये करार
मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत करार करायचा होता तर तो इथेच का करता आला नाही, असा सवाल विरोधकांनी केला. पण अभिषेक लोढा हे केवळ मंगलप्रभात लोढा यांचे सुपूत्रच नाहीत तर ते एक प्रथितयश उद्योगपतीही आहेत. अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या डेटा सेंटर कंपन्या गुंतवणूक करणार असून लोढांनी त्यांच्या वतीने करार केला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीचे
आश्वासन पूर्ण करणार
शेतकरी कर्जमाफीबाबत समिती नेमली आहे. कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिले ते उचित वेळी पूर्ण करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागच्या वर्षी संकट आले तेव्हा शेतक-यांंच्या खात्यात डीबीटीद्वारे १५ हजार ४७२ कोटी रोख थेट जमा केले. मागच्या अनेक कर्जमाफीत बँका चुकीची खाती देतात, असे दिसून आले. आता आपण अ‍ॅग्रीस्टॅक केले आहे. शंभर टक्के शेतक-यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा अहवाल असा शेतीचा डिजीटल रेकॉर्ड तयार केला. कर्जाचे खाते आधार सीडेड आहे. ख-या गरजू शेतक-याला कर्जमाफी देणार आहोत, असेही ते म्हणाले.

लवकरच नवीन
सरकारी भरती
राज्यात बेरोजगारीचा दर ११.६० टक्के झाल्याचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा आहे. बेरोजगारीचा दर ३.१ टक्क्यांपर्यंत कमी झालेला आहे. महायुती सरकार आल्यापासून १ लाख २० हजार ४४९ लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत. अजून काही नियुक्तीपत्रे शिल्लक असून दोन महिन्यात दीड लाखापर्यंत हा आकडा जाईल. पुन्हा नव्याने एचआर रिफॉर्म्स करण्यात आले असून नव्याने भरतीचे सत्र सुरू करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR