हैदराबाद : मिझोराममध्ये संपूर्ण विधानसभा जागांसाठी आणि छत्तीसगड मध्ये २० जांगांसाठी मतदान पार पडले आहे. तसेच राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणामध्ये सर्वच राजकीय पक्ष आक्रमकरीत्या प्रचार करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये अनेक नेत्यांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याचे वृत्त आहे. यावरून माजी कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी निवडणूक राज्यांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कायद्याचे खुलेआम उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये ईडीच्या कारवाईमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी गुरुवारी निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे आवाहन केले आहे. निवडणुकीच्या काळात विरोधी नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाचा छापा “गांभीर्याने” घेण्याचे आवाहन करून, माजी केंद्रीय कायदा मंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की, जेंव्हा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता लागू होते तेंव्हा सरकारला बऱ्याच गोष्टी करायला आवडतात.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून अनेक राज्यांमध्ये कारवाई करण्यात येत आहे. सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (दुसरा टप्पा) १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. पाच राज्यांतील मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.
अत्यंत अलोकतांत्रिक
ते म्हणाले की, आचारसंहिता नावाची एक गोष्ट आहे. आचारसंहितेचा आत्मा आहे. आचारसंहितेचा खरा सार हा समतल खेळाचा आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उमेदवारांवर छापे टाकणे अत्यंत अलोकतांत्रिक आहे. हे आदर्श आचारसंहितेच्या भावनेचे उल्लंघन आहे.
रेड्डी यांच्या निवासस्थानावर छापा
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयकर अधिकाऱ्यांनी गुरुवारी तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील काँग्रेस नेते पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. रेड्डी खम्मम जिल्ह्यातील पालेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. लोकसभेचे माजी सदस्य असलेले रेड्डी यांनी अलीकडेच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.