नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले आहे. पॉन्झी स्कीम घोटाळ्याप्रकरणी ईडीने तामिळनाडूतील त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकला होता. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज प्रणव ज्वेलर्सची जाहिरात करतात. छापेमारीनंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली आहे.
तामिळनाडूतील त्रिची येथील प्रसिद्ध प्रणव ज्वेलर्समध्ये पीएमएलए अंतर्गत शोध मोहिमेदरम्यान, अशी अनेक कागदपत्रे सापडली ज्यामध्ये सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाली. तसेच ईडीने झडतीदरम्यान ११ किलो ६० ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले होते. प्रणव ज्वेलर्सच्या लोकांनी जनतेकडून गोळा केलेले १०० कोटी रुपये अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून दुसरीकडे गुंतवल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.