नागपूर : प्रतिनिधी
दस-यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात विजयादशमी सोहळा पार पडत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त ‘शस्त्रपूजन’ केले. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य केले.
मोहन भागवत म्हणाले की, पश्चिमेकडून एक ‘वादळ’ उठले आहे आणि त्याबाबत सावध राहणे आवश्यक आहे. कारण फ्रान्स आणि अल्बेनियामध्ये घडणा-या घटना जग पाहत आहे आणि भारतातही असेच प्रयत्न केले जात आहेत. परंतु अशा प्रकारच्या अयोग्य वर्तनाला भारतात स्थान नसावे. लोकशाहीत निदर्शने होणे ही एक स्वाभाविक गोष्ट असली, तरी त्यावर उपाय समाजातूनच शोधले पाहिजेत. कोणत्याही निदर्शनाचा उद्देश हा तोडगा काढणे हाच असावा. काही लोक केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी इतरांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात, असा आरोप भागवत यांनी केला.
मोहन भागवत म्हणाले की, आपण भारताचे लोक एक आहोत. आपली एकता नैसर्गिक आहे आणि ती हृदयापासून निर्माण होते. हा कोणताही व्यवहार किंवा करार नाही. ही कोणतीही अटींवर आधारित अशी व्यवस्था नाही, जिथे कोणी असे म्हणू शकेल की, ‘जर मला बदल्यात काही मिळाले तरच मी भारताचा आहे, अन्यथा नाही.’ खरं तर आपली एकता बिनशर्त आहे. भारताकडून आपल्याला काही मिळो किंवा न मिळो, आपल्याकडे जे काही आहे, ते सर्व भारताचेच आहे. जेव्हा आम्ही संघामध्ये ‘हिंदू भावने’ला बळकट करण्यासाठी एक संघटित आणि सशक्त हिंदू समाज घडवण्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ इतर धर्मांबद्दलचा परस्पर आदर किंवा राष्ट्रीय एकता यांच्या विरोधात जाणे असा अजिबात नाही.
हिंदू मानसिकता आणि चारित्र्य मुळातच सर्वसमावेशक असल्याने आणि सर्वांना सामावून घेणारे असल्याने हा प्रयत्न प्रत्यक्षात आपली भावनिक एकता, सदिच्छा आणि नैतिक अखंडता अधिक दृढ करतो. याच मूल्यांपासून (संस्कारांपासून) प्रेरित होऊन, कॅप्टन स्मित मच्छार यांनी अलीकडे जे कृत्य केले, ते पूर्णपणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत कसे वागावे, याचे कोणतेही विशेष प्रशिक्षण त्यांना दिलेले नव्हते. उलट त्या कसोटीच्या क्षणी त्यांच्यामध्ये रुजलेली परंपरा आणि मूल्ये आपोआपच समोर आली, असे म्हणत मोहन भागवत यांनी स्मित मच्छार यांचे कौतुक केले.
















