मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मागचे जवळपास दोन सव्वा दोन महिने सुरू असलेला महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर परवा सुटला. अनेक महत्त्वाच्या जागांवरून मित्रपक्षांसोबत जोरदार रस्सीखेच आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चांचा काथ्याकूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा मिळून आपली ताकद सिद्ध केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या खासदारांचे मतदारसंघ असलेल्या जागांपैकी पालघरचा अपवाद वगळता इतर सर्व जागा शिंदे गटाला मिळाल्या.
सोबतच दक्षिण मुंबई आणि ठाणे हे मतदारसंघही आपल्याकडे खेचून आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. विशेषत: ठाणे आणि नाशिक या मतदारसंघांवरून महायुतीमध्ये जबरदस्त खेचाखेची झाली. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने हे मतदारसंघ आपल्याकडे राखले. त्यामुळे जागावाटपात भाजपा शिंदे गटाचे खच्चीकरण करणार, शिंदेंच्या शिवसेनेची एक आकडी जागांवर बोळवण केली जाणार, काही खासदारांना भाजपाच्या चिन्हावर लढवले जाणार आदी एक ना अनेक प्रश्नांचा निकाल लागला. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाच्या तहामध्ये एकनाथ शिंदे जिंकले असे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
खरं तर शिवसेनेत झालेल्या बंडाचे नेतृत्व करून एकनाथ शिंदे हे सुमारे ४० आमदारांना घेऊन महायुतीमध्ये आले, तेव्हा अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मित्रपक्षांना एखादे जास्तीचे मंत्रिपदही न सोडणारा भाजपा शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपद देतो ही बाब तेव्हा आश्चर्यकारक वाटली होती. मात्र या बंडाला वर्ष होता होता अजित पवारही आपल्या अनेक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सोबत घेऊन महायुतीत डेरेदाखल झाले होते. दोन तुल्यबळ पक्ष असताना महायुतीत तिसरा पक्ष आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होईल, अशी शक्यता तेव्हापासूनच निर्माण झालेली होती. प्रत्यक्ष जागावाटपावेळी घडलेही तसेच. अबकी बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५+ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवलेल्या भाजपाने महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेत ताठर भूमिका घेण्यास सुरुवात केली होती.
भाजपा महाराष्ट्रात ३२ ते ३६ जागा लढवेल, अशी चर्चा होती. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ९ ते १२ जागांवर बोळवण होणार, असा दावा केला जात होता. शिंदे गटातील विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार, काहींना कमळ चिन्हावर लढवणार, या चर्चांमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. शिंदे गटातील काही नेत्यांनी या अस्वस्थतेला मोकळी वाटही करून दिली. मात्र शिंदे गटाचे मुख्य नेते असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या काळात फारच संयमी भूमिका घेतल्याचे दिसले. त्यांनी महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होतील, असे कुठलेही विधान उघडपणे केले नाही.
उलट महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहेत त्या सर्व जागा मिळतील, असे सातत्याने सांगितले. सुरुवातीचे बरेच दिवस एकनाथ शिंदे यांनी जागावाटपात किती जागा मिळतील, हा आकडा कधीही स्पष्टपणे सांगितला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमधून त्यांनी आपला पक्ष १६ जागा लढवेल, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र शिंदें गटाला कुठल्या जागा मिळतील, याबाबतचा तिढा कायम होता. त्यात विशेष करून नाशिक आणि ठाणे हे मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आग्रही होता. मात्र ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो मतदारसंघ भाजपाला सोडणे शिंदेंसाठी नामुष्की ठरली असती. तर नाशिकमध्ये शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा आधीच करून ठेवली होती.
त्यामुळे तिथेही माघार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघांमध्ये शेवटपर्यंत चर्चा आणि वाटाघाटींची भूमिका घेतली आणि हे मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणले. त्यामुळे पालघरचा अपवाद वगळता सोबत असलेल्या १३ खासदारांपैकी १२ मतदारसंघ शिंदेगटाला मिळाले. सोबत ठाणे, दक्षिण मुंबई, छत्रपती संभाजीनगर हे आणखी तीन मतदारसंघही शिंदेंनी मिळवले. महायुतीमधील जागावाटपाचे सध्याचे चित्र पाहता शिंदे फायद्याात राहिले.