परभणी : जिल्ह्याचे जुने खासदार विकासाला विसरले असून आता महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या रूपाने एका सक्षम खासदाराला निवडून द्या. त्यांना दिलेले मत नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे असून ते कर्जरूपाने तुमच्याकडे मत मागत आहेत. पुढच्या ५ वर्षांत विकासाच्या व्याजासह ते परत करतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार दि. १ एप्रिल रोजी आयोजित जाहीर सभेत केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीच्या वतीने सोमवारी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानावर झालेल्या या सभेस उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. बबनराव लोणीकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ. रत्नाकर गुट्टे, आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, राजेश विटेकर, राहुल लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, रिपाइंचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे आदींची उपस्थिती होती.
विटेकरांना विधिमंडळ सदस्य करू : पवार
परभणी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजेश विटेकर, लोणीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर ही मंडळी इच्छुक होती. प्रत्येकाला महत्वकांक्षा असते आणि ही काही चुकीची बाब नाही. विटेकर यांना आपणच तयारी करायला सांगतिले होते. या पार्श्वभुमीवर वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असून येत्या ६ महिन्यांत विटेकरांना विधिमंडळ सदस्य करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतील जाहीर सभेत बोलताना दिले.